- श्रीधर फडके, संगीतकारगीतरामायण सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारोह १४ एप्रिल २००५ला पुण्याच्या रमणबागेत मोठ्या दिमाखात पार पडला. एप्रिल असूनही अचानक प्रचंड पाऊस पडत होता व हजारो पुणेकर रसिक त्या पावसात, चिखलात चक्क खुर्च्या उलट्या डोक्यावर धरून हा सोहळा अनुभवत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, प्रमोद महाजन, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, बिंदूमाधव जोशी, माडगूळकर कुटुंबीय अशा विविध दिग्गजांच्या उपस्थितीत हा ४-५ दिवसांचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. पण या सोहळ्याचे आकर्षण होते अटलबिहारी वाजपेयी. बाबूजींचा आणि वाजपेयींचा खूप जुना परिचय. वाजपेयींचा व्यासंग इतका अफाट होता की त्यांना हिंदी साहित्याबरोबरच इतर भाषांतील साहित्याबाबत आपुलकी होती आणि चांगली जाणही होती. याला कारण होते त्यांचे अफाट वाचन आणि बुद्धिमत्ता. वाजपेयीजी खरेच एक हुशार व्यक्तिमत्त्व होते. मराठी साहित्यावर आणि कवितांवर त्यांचे विशेष प्रेम होते. १९८०ला झालेल्या गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमालाही वाजपेयी उपस्थित होते. मराठी भाषेचे अफाट ज्ञान असलेल्या वाजपेयींनी रमणबागेत केलेल्या मुद्देसूद भाषणाने तेव्हा उपस्थित श्रोते पावसातही मंत्रमुग्ध झाले होते.मी खूप लहान असतानाचा एक किस्सा आठवतोय. बाबूजी आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघेही शब्दांवर, कवितेवर प्रेम करणारी माणसे होती. त्यामुळे पुढे आयुष्यभर दोघांचे ऋणानुबंध कायम टिकले ते याच कवितेमुळे, शब्दांमुळे. १९७२च्या सुमारास वाजपेयींचा बाबूजींना एक दिवस अचानक फोन आला. बाबूजी मी काही कामानिमित्त मुंबईत आलोय. माझी इथली सर्व कामे आटोपली आहेत. मला एक सुंदर मराठी सिनेमा पाहायचाय. तो तुम्ही मला दाखवाल का? वाजपेयींनी बाबूजींना एक दर्जेदार मराठी सिनेमा दाखवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती. बाबूजींनीही वाजपेयींना उत्तर दिले. तुमची इच्छा पूर्ण करतो मी, पण तुम्ही पहिले माझ्या घरी जेवायला या. मस्त मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घ्या. मग आपण दोघेही सिनेमा पाहायला जाऊ. बाबूजींचे आमंत्रण वाजपेयींनी स्वीकारले आणि वाजपेयी बाबूजींच्या घरी दाखल झाले. मुंबईतील आमच्या अगदी छोटेखानी मात्र अतिशय सुंदर घरात वाजपेयींनी आपला बडेजाव घराच्या उंबरठ्यावरच बाहेर काढून ठेवला होता. अतिशय साधेसरळ व्यक्तिमत्त्व, डोळ्यांत तेज असणाऱ्या, अतिशय शुद्ध वाणीत हिंदीत बोलणाºया वाजपेयींना मी इतक्या जवळून पाहत होतो. आमच्या घरी वाजपेयींच्या जेवणाची जय्यत तयारी केली होती. मराठमोळ्या पद्धतीने अगदी पंगत वगैरे बसवून सुग्रास जेवणाचा बेत होता. या सुग्रास जेवणाचा आस्वाद वाजपेयींनी अगदी आवडीने घेतला. स्वच्छ शुभ्र धोतर, झब्ब्यात असणाºया वाजपेयींनी मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवणाचा आस्वाद घेतला होता. इतका साधा, सरळ माणूस मी पहिल्यांदाच पाहत होतो. जेवण झाल्यावर बाबूजी आणि वाजपेयी सिनेमा पाहण्यासाठी निघाले. दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचे बाबूजींनी नक्की केले. त्या वेळी प्लाझामध्ये निर्माते शरद पिळगावकरांचा (अभिनेते सचिन पिळगावकरांचे वडील) ‘अपराध’ सिनेमा चांगली गर्दी खेचत होता. हा सिनेमा पाहून वाजपेयींना खूप आनंद झाला. त्यानंतर १९८०ला गीतरामायणाचा रौप्यमहोत्सवी सोहळयालाही वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. अशा कविमनाच्या जिंदादिल माणसाच्या सान्निध्यात वेळोवेळी राहण्याची संधी मिळाली हे भाग्यच.गीतरामायणाचे त्यांनी केलेले विवेचन हा त्यांच्या भाषणशैलीचा अतिउच्च नमुना होता हे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणवले होते. शब्दांची केलेली गुंफण तसेच गीतरामायण लोकांना इतके का आवडते याची वाजपेयींनी त्यांच्या भाषणात केलेली मांडणी ही निव्वळ अप्रतिम होती.
(शब्दांकन - अजय परचुरे)