नागपूर : मराठा समाजाच्या आक्रोशाला ‘सैराट’ चित्रपट जबाबदार असल्याचे वक्तव्य करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे तर गमतीचा भाग आहेत, असा टोला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लगावला.‘सैराट’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आंतरजातीय प्रेमकथेमुळे मराठा समाजात आक्रोश निर्माण झाल्याचे वक्तव्य आठवले यांनी नुकतेच केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या चित्रपटाचे दिग्दर्शक मंजुळे यांनी अधिक भाष्य न करता आठवले यांना ‘गमती’ ठरविले.नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रविवारी सन्मान मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर का होत आहे, याबाबत नीट चौकशी व्हावी. ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द झाला तर परिस्थितीत खरेच किती फरक पडेल याबाबतदेखील सखोल अभ्यास व्हावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.जीवनात आपल्याला अनेक जण मार्गदर्शन करतात. परंतु अनेक विचारवंत ऐकले की संभ्रम वाढतो. त्यामुळे जगण्यातूनच आपण शिकले पाहिजे. ‘एनएसएस’ हे जगण्यातून शिकविणारे माध्यम आहे. शिक्षणामुळे एक रुबाब येतो व काही वेळा हाच रुबाब प्रगतीच्या आडदेखील येतो. मला असाच अनुभव आला आहे, असे मंजुळे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
‘आठवले हे तर गमतीचा विषय!’
By admin | Published: September 19, 2016 4:47 AM