मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. मात्र पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यावी तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. एका वृत्तवाहिनाला प्रतिकिया देताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीतील निकालाचे आकडे पाहिल्यास दोन्ही काँग्रेस पक्षाचे 108 जागा असून, त्यांनी बाहेरून पाठींबा दिल्यास शिवसेनेचे सरकार येऊ शकते. मात्र असे करणे भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे ठरणार नाही. दोन्ही पक्षाची जुनी मैत्री असून त्यांनी एकत्र यायला पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका असल्याचे मत आठवलेंनी यावेळी व्यक्त केलं.
तर भाजप-शिवसेनेकडून होत असलेल्या मुख्यमंत्रीपदाबबत बोलताना आठवले म्हणाले की, शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी फार आग्रही भूमिका घेऊ नये. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी खूपच आग्रह असेल आणि ते भाजपला मान्य नसेल तर, राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिल्यास त्यांची सत्ता येऊ शकते. मात्र हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेसोबतच जुळवून घ्यावे असेही आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री पदावरून सध्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच ओढतान सुरू झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे शिवसेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यातच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर देखील सत्ता पुन्हा मिळविण्याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदावरून उभय पक्षात जुगलबंदी सुरू झाली आहे.