पनवेल : नोटाबंदीनंतर सरकारने बँकेत पैसे भरणे, तसेच काढण्यासाठी निर्बंध लादले होते. या कालावधीत देशात सर्वच बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. त्यानंतर परिस्थिती काही दिवसांनंतर सुरळीत झाली होती. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. यानंतर लागोपाठ सुट्यांनंतर अनेक बँकांच्या एटीएमला रिझर्व्ह बँकेच्या वतीने पैशांचा पुरवठा झाला नसल्याने पुन्हा एकदा अनेक एटीएम बंद होते. तसेच आपल्या परिसरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने संपूर्ण शहराच्या खेट्या माराव्या लागत आहेत. पनवेलमधील नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे या शहरांत ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. रिझर्व्ह बँकेतून एटीएमना पैशांचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ही समस्या पनवेलमधील विविध भागांत भेडसावत आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरु वातीमुळे १ एप्रिल रोजी बँकांचे कामकाज बंद होते. त्यानंतर २ मार्च रविवारी आणि ३ मार्चला सोमवारी बँकांचे कामकाज सुरू होते. मात्र, मंगळवारी ४ मार्चला रामनवमीची सुट्टी असल्याने बँका बंदच होत्या. दरम्यान, या सुटीच्या कालावधीत सर्वच एटीएम रिकामी झाले. पनवेल तालुक्यात विविध बँकांचे जवळ जवळ ३००पेक्षा जास्त एटीएम आहेत. मात्र, यामधील निम्म्या एटीएममध्ये दोन दिवसांत पैशांचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांची नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा तारांबळ उडाली. (प्रतिनिधी)कामोठे येथील केतन शिरोडकर म्हणाले की, शहरात १० पेक्षा जास्त एटीएम फिरलो, तरीसुद्धा बरेचशी एटीएम बंदच होती. अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्याची कोणाला माहिती नसल्याने मीदेखील संभ्रमात होतो. बुधवार, ५ मार्चपासून एटीएममधील ही परिस्थिती काही प्रमाणात पूर्ववत झाली. यासंदर्भात नवीन पनवेलमधील एका बँकेच्या व्यवस्थापनाने नाव न छापण्याच्या अटींवर माहिती देताना सांगितले की, बँक ांना व्यवस्थित पैशांचा पुरवठा झाला आहे. मात्र, रिझर्व्ह बॅँकेद्वारे एटीएममध्ये पैसे पुरविणाऱ्या एजन्सीला पैसे वेळेवर पुरविले नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले.
पनवेलमधील एटीएम पुन्हा एकदा बंद
By admin | Published: April 06, 2017 2:32 AM