मुंबई : मी फासे पारधी समाजातील असून, वयाच्या अकराव्या वर्षापासून भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या हक्कांसाठी लढत आहेत. जातीमुळे होणारा अत्याचार हा व्यक्तीच्या जन्मापासूनच सुरू होतो. माझ्या समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविषयी जागृती नाही आणि ती व्हावी म्हणून मी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले यांनी केले. जर देव हयात आहे तर मला त्याला विचारायचे आहेकी, तू आम्हाला गुन्हेगार म्हणून जन्माला का घातले, असा कळकळीचा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे भटक्या विमुक्तांच्या ६६ व्या विमुक्त दिन व उमाजी नाईक यांच्या २२६ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात सुनीता भोसले बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, राजीव गांधी समकालीन अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पुरी, प्रो. बिपीन जोजो, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी रेणके, भटके विमुक्त हक्क परिषद संस्थेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे उपस्थित होते.लक्ष्मण गायकवाड म्हणाले की, कोणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हा करत असेल तर तो व्यक्ती गुन्हेगार नसून; तो ज्या देशात जन्माला आला, तो देशच गुन्हेगार आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.पल्लवी रेणके म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असली तरी आजही या समाजाचे अन्न, वस्त्र व निवाºयाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊन या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेऊ शकतो, असा एकही नेता आज प्रशासनात नाही. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी या निर्णय प्रक्रियेत आमचे प्रतिनिधित्व असणे अत्यंत आवश्यक आहे.धनंजय ओंबासे म्हणाले, आमच्या समाजातील लोकांना मृत शरीराची विल्हेवाट लावण्यासाठीदेखील जागा मिळत नाही. ही भटक्या विमुक्तांच्या दुरवस्थेची सद्य:स्थिती आहे.
‘जातीमुळे होणारा अत्याचार जन्मापासूनच सुरू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 2:52 AM