लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एक तरुण अल्पवयीन मुलींना वासनेचा बळी पाडत असल्याची बाब उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांत मुंबईसह नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या सहा घटना घडल्या आहेत. त्या सर्व घटनांमध्ये सीसीटीव्हीत एकच तरुण वेगवेगळ्या ठिकाणी असले कृत्य करत असल्याचे समोर आले आहे.काही दिवसांपूर्वी सीबीडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी संध्याकाळी सीबीडी येथील पारसिक हिल परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. या वेळी पोलिसांनी दोन्ही घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, दोन्ही घटनांमध्ये एकाच तरुणाचा समावेश असल्याचे उघड झाले. शिवाय त्याच तरुणाने वाशी व मुंबईत दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मात्र, त्याच्याविषयीची अधिक कसलीच माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी तपासकार्याला सुरुवात केली आहे. त्याकरिता गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. शिवाय त्याचे छायाचित्र नवी मुंबईसह लगतच्या परिसरात प्रसिद्ध करून त्याच्याविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, या घटनांमुळे पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. घराबाहेर एकट्या खेळत असलेल्या अथवा रस्त्याने चाललेल्या मुलींना वेगवेगळ्या कारणाने एकांतात नेऊन त्यांच्यावर तो बलात्कार करत आहे. यावरून तो सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By admin | Published: July 13, 2017 3:25 AM