मुंबई - अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
अपर्णा नावाची ही महिला सध्या नवी मुंबईत राहते. ती पतीपासून विभक्त राहते. साडेतीन वर्षांपूर्वी अमेरिकास्थित अमीरअली हाजीयानी याच्याशी तिचा पुनर्विवाह झाला. पुण्यात निवडक नातेवाईक आणि परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा हाजीयानी कुटुंबाने मानसिक छळ सुरू केला.जातीय द्वेष आणि भेदभावालाही त्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे.
मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकारअपर्णाची सासू आणि जावेने पोलिसांच्या चौकशीत ती मागासवर्गीय असल्याने नांदवण्यास नकार दिला, असे कबुल केले होते. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे अपर्णा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बोरिवली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने अपर्णा यांच्या मागणीवरून हा गुन्हा गोरेगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
पहिल्या पत्नीचाही केला होता छळहाजीयानीने त्याच्या पहिल्या पत्नीने अमेरिकेत दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार अपर्णापासून लपवून ठेवली होती. गेले वर्षभर हाजीयानीने तिच्याशी संपर्क ठेवलेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गेल्यावर्षी ४ जुलैला बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल केली.