पिंपरी- भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रॉसिटीचा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, दंगल आणि हत्यार बंदीच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे खापर संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीवर फोडण्यात आले आहे. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला होता. शिव प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे निघालेल्या जमावावर दगडफेक केली आणि हिंसाचार सुरू झाला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सर्वसामान्यांना त्रास होईल असं काही करू नका असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केलं आहे.'त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो, पण आऊट ऑफ कव्हरेज होते. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा माझा आरोप आहे', असं प्रकाश आंबेडकर बोलले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. तसंच कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं अनुदान बंद करावं अशी मागणीही केली.
तर भीमा-कोरेगावातल्या हिंसाचारात आतापर्यंत एकाला जीवही गमवावा लागला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पबल आणि शिकरापूर गावातील दोन गटांत वाद निर्माण झाला आहे. पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरच्या पुणे-अहमदनगर महामार्गावरील पेरणे फाट्याजवळ हा हिंसाचार उफाळून आला आहे.या हिंसाचारात 25हून अधिक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर 50हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव हिंसेचे महाराष्ट्रातील अनेक भागात पडसाद उमटले आहेत.