मुंबई: नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर आता एटीएसनं आणखी दोघांना अटक केली आहे. त्यातील सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा नालासोपाऱ्यात घातपात घडवण्याचा कट यांनी आखला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. एटीएसनं या प्रकरणात विविध टाकलेल्या छाप्यांमधून 20 बॉम्ब आणि 50 बॉम्ब तयार करता येतील इतकं साहित्य जप्त केलं आहे.
शिवप्रतिष्ठानचं स्पष्टीकरणसुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता, पण गेल्या चार वर्षांपासून त्याचा संघटनेशी कुठलाही संबंध नाही. त्याच्याकडे शिवप्रतिष्ठानचं कुठलंही पद नाही. सध्या कुठल्याही गोष्टीचा संबंध संभाजी भिडे यांच्याशी जोडला जातो. परंतु, आम्ही देशभक्त कार्यकर्ते घडवतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीच मागणी आम्हीही करतो, असं शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन चौगुले यांनी स्पष्ट केलं.