- लक्ष्मण मोरे, पुणेशिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मित्रांच्या प्रभावाखाली येऊन धर्मांतर करणारा एक तरुण दहशतवादीविरोधी पथकाच्या प्रयत्नांमुळे घरी परतला. तो धार्मिक कट्टरपंथी विचारांकडेही झुकू लागला होता. आता त्याला या विचारांच्या पगड्यामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न आईवडिलांकडून सुरू आहेत.पुण्याच्या एक तरुण २००८-०९ साली बीड जिल्ह्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेला होता. तेथे घर मालकाच्या मुलाशी त्याची मैत्री झाली. नंतर या मित्राच्या धर्माप्रमाणेच त्याचे आचरण सुरू झाले. इंटरनेटवरच्या एका संकेतस्थळामुळे गुजरातमधील एका धर्मगुरुच्या तो संपर्कात आला. या धर्मगुरुने त्याला स्वत:च्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेत धर्मविषयक चर्चेत सहभागी केले. त्यानंतर या तरुणाने स्वत:चाही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. धर्मगुरुने दिलेल्या परदेशातील तरुणांचे क्रमांक त्याने या ग्रुपमध्ये घेतले. आणखी एका धर्मगुरुचे इंटरनेटवरचे धार्मिक आवाहनही त्याने ऐकले. कुटुंबियांना त्याच्या या हालचालींबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला घरी आणले. त्याचा मोबाईल काढून घेतला. मात्र, त्यानंतर या तरुणाने घरच सोडले. त्यानंतर या तरुणाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा धर्मगुरुंनी तुला कोणीही स्वीकारणार नाही’, अशी भीती घातली. या तरुणाचा आईवडिलांशी अधूनमधून संपर्क होत होता. मुलाच्या या हालचाली पाहिल्यानंतर त्यांनी शेवटी एटीएसचे पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांची भेट घेतली. बर्गे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा अहमदाबादपर्यंतचा माग काढला. परंतु त्याचा पुढील ठावठिकाणा समजत नव्हता. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची मदत घेण्यात आली. पोलिसांनी त्याला समजावून परत येण्याविषयी विश्वासात घेतले. एटीएसच्या प्रयत्नांमुळे हा तरुण आॅक्टोबरमध्ये घरी परतला. कोणी कोणता धर्म स्वीकारावा, कोणत्या धर्माचे आचरण करावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु हा तरुण सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारांकडे आकर्षित झाला होता. त्याचे या संदर्भात चॅटिंग चालायचे. त्यामुळे त्याला परावृत्त करणे आव्हान होते. - भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त
एटीएसमुळे पुण्यातील तरुणाची ‘घरवापसी’
By admin | Published: November 19, 2015 1:59 AM