ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 26 - इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून परभणीतील दोन जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतरही हे पथक परभणीतच ठाण मांडून असून, ताब्यात घेतलेल्या आरोपींशी अन्य कोणा-कोणांचे संबंध आहेत? याबाबतची गुप्त तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून परभणी येथून नासेरबीन चाऊस याला १३ जुलै रोजी एटीएस पथकाने अटक केली होती़ नासेरबीन चाऊस याची पोलिस कोठडीत चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून एटीएसच्या पथकाने रविवारी दुसरा आरोपी शाहीद खान याला इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केली़ त्याच्याकडून १ किलो ६०० ग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली़ त्यानंतर सोमवारी एटीएसच्या पथकाने शाहीद खान याच्या घराची झडती घेतली़ यावेळी काहीही मिळाले नसले तरी एटीएसचे पथक मात्र परभणीत तळ ठोकून आहे़ एटीएसच्या पथकाला आणखी काही बाबींविषयी संशय असून, त्या दृष्टीकोनातून हे पथक कामाला लागले आहे.
नासेरबीन चाऊस व शाहीद खान या दोघांशी संबंधित कोणत्या व्यक्ती आहेत, याची पडताळणी एटीएसचे पथक करीत असून, याबाबतची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जात आहे़ विशेष म्हणजे परभणी शहरात गेल्या महिनाभरापासून एटीएसचे पथक तळ ठोकून आहे़ इतर ठिकाणच्या सुरक्षा एजन्सींची पथकेही परभणीत येऊन गेली आहेत़ दुसरीकडे परभणी पोलिसांनी शहरात पोलिस बंदोबस्त वाढविला असून, इसिसच्या दहशतवादी कारवायांबाबत पोलिसांकडून शहरात जनजागृती सुरू करण्यात आली आहे़ या अनुषंगाने कॉर्नर बैठकांना सुरुवात झाली असून, मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठकही घेण्यात आली़ परभणीतील आठ जण बेपत्तापरभणी जिल्ह्यातून २०१५-१६ या वर्षात एकूण ८ मुस्लीम युवक हरवले असून, त्यापैकी तीन युवक हे मतीमंद असल्याने कोठेतरी निघून गेले आहेत़ एक युवक कर्जबाजारीपणामुळे निघून गेला आहे तर दोन युवक मिस्त्री काम करण्यासाठी जातो, असे सांगून गावातून निघून गेले आहेत़ उर्वरित दोन युवक कोणत्या तरी कारणावरून हरवले किंवा घरून निघून गेले आहेत, अशी माहिती परभणी पोलिसांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली़ बेपत्ता असलेले हे युवक तिसरी ते नववीपर्यंत शिक्षण घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.