ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा चार पानांचा अहवाल शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. या अहवालात वाझेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करतानाच, या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे एटीएसने म्हटले आहे. मुंबईचे निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात असून, त्यांचा ताबा एटीएसला मिळावा, यासाठी अर्जाची सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. (ATS wants control of Sachin Vaze; Hearing on the petition to be held on March 30, the demand for protection to the Waze family was accepted) दरम्यान, वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली.सध्या मुंबईतील ‘अँटालिया’ इमारतीजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ मोटार मिळाल्याच्या घटनेबाबत वाझेंना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ने अटक केली आहे. त्याआधी त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जाची सुनावणी आज (शुक्रवारी) होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांना एनआयएने अटक केली. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)आपले म्हणणे न्यायालयात सादर करावे, असे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्यामुळे हिरेन यांच्या कुटुंबीयांनी वाझेंवर केलेले आरोप व एटीएसने हिरेन यांच्या कथित हत्या प्रकरणात आतापर्यंत केलेला तपास यासंदर्भात चार पानी अहवाल ठाणे न्यायालयात सादर केला. या अहवालातून बऱ्ययाच बाबी समाेर येतील, असे सांगण्यात येत आहे. एटीएसने हिरेन यांच्या कथित हत्या प्रकरणात आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, संबंधितांचे नोंदविलेले जाबजबाब याआधारे वाझेंना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. या प्रकरणाचा तपास करून निष्कर्षाप्रत येण्याकरिता वाझेंचा ताबा एटीएसला हवा आहे. दरम्यान, साकेत सोसायटीमध्ये राहणाऱ्या वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, प्रसारमाध्यमांकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, अशी मागणी वाझेंच्या बहिणीने केली. त्यावर वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने ठाणे पोलिसांना दिले.यासाेबतच अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी तहकूब करण्यात आल्यामुळे आता ही सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील हेमंत लोंढे यांनी एटीएसच्या बाजूने न्यायालयात तपास अहवाल सादर केला.
‘सचिन वाझेंच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याबाबत ठाणे न्यायालयाचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाले की त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर