जळगाव : जबरदस्तीने जागेचा कब्जा मिळविण्यासाठी राहते घर व दुकान तोडून श्रीधर श्रावण बडगुजर व त्यांच्या कुटुंबियाला लाकडी दांडके, चाकू व इतर शस्त्राने बेदम मारहाण झाल्याची घटना शनिवारी पिंपळगाव हरेश्वर येथे घडली. यात श्रीधर बडगुजर यांना गंभीर दुखापत झाली असून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उज्ज्वला गणेश बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन तिरुपती रतिलाल झेरवाल, प्रतिक्षा अनिल तेली, अमोल हिरालाल तेली, रतिलाल झेरवाल याची पत्नीव ममता संजय तेली (सर्व रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत श्रीधर बडगुजर, मुलगा गणेश, पत्नी मंगलाबाई, सून उज्ज्वला व धार्मीक विधीसाठी आलेली मुलगी कल्पना प्रमोद बडगुजर (रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) आदी जखमी झाले आहेत.
कल्पना यांना दोन महिलांनी चावा घेतला आहे. श्रीधर बडगुजर यांच्या ताब्यात असलेल्या जागेचा न्यायालयात वाद प्रलंबित आहे, असे असतानाही या जागेवर कब्जा मिळविण्यासाठी झेरवाल कुटुंबाने शनिवारी घर व दुकानाची तोडफोड करुन कुटुंबियावर हल्ला चढविला. दरम्यान, ही घटना घडत असताना काही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते, त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप कल्पना बडगुजर यांनी केला आहे. यापूर्वी देखील पोलिसांकडे तक्रार करुन दखल घेतली गेली नाही, असेही त्यांनी सांगितले.