घराणेशाहीच्या आरोपावरून भाजपावर वार; कन्हैया कुमारनं गाजवलं कोल्हापूरचं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 07:00 PM2023-08-20T19:00:34+5:302023-08-20T19:01:07+5:30

सध्या सोशल मीडिया हत्यार आणलंय, नाव सोशल मीडिया पण काम असोशल मीडिया, इतिहास घडवला जात नाही तर इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.

Attack on BJP on allegations of nepotism; Kanhaiya Kumar Target Narendra Modi, Amit Shah in Kolhapur | घराणेशाहीच्या आरोपावरून भाजपावर वार; कन्हैया कुमारनं गाजवलं कोल्हापूरचं मैदान

घराणेशाहीच्या आरोपावरून भाजपावर वार; कन्हैया कुमारनं गाजवलं कोल्हापूरचं मैदान

googlenewsNext

कोल्हापूर -  ही लोकशाही आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी सगळेच निवडणूक लढून संसदेत येतात. प्रियंका गांधी निवडणूक लढल्या नाहीत, म्हणून त्या संसदेत नाहीत. राहुल गांधींचे खासदार बनणे घराणेशाही आहे मग अमित शाह यांचा मुलगा बीसीसीआयचा सेक्रेटरी बनणे त्यात घराणेशाही नाही का? ज्योतिरादित्य शिंदे, यूपीएमध्ये होते, त्यांचे वडीलही मंत्री होते. जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत घराणेशाही होती. परंतु मोदींच्या बाजूला जाऊन बसताच आता ते घराणेशाहीवर टाळी वाजवतात. आमच्या पक्षात घराणेशाही तर संघातदेखील घराणेशाही आहे. मेनका गांधी-वरूण गांधींच्या भाजपात घराणेशाही नाही असा घणाघात कोल्हापूरच्या सभेत कन्हैया कुमार यांनी भाजपावर केली.

जय महाराष्ट्र बोलून कन्हैया कुमार यांनी त्यांच्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. त्यानंतर हिंदीत भाषण करण्याची परवानगी घेत कन्हैया कुमारनं कोल्हापूरचं मैदान गाजवलं. कन्हैया कुमार म्हणाले की, भाजपा लोकांना मुर्ख बनवते. पण हा खेळ आम्हाला समजतो. आम्ही राजकारणाला करिअर समजत नाही. लोकांच्या करातून येणाऱ्या पैशातून आम्ही शिक्षण घेतलंय, महात्मा गांधी परदेशात शिकले आणि जेव्हा भारतात आले तेव्हा बिहारमध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी घेतले. गांधींनी सूट काढला आणि खादी घातली. पण गुजरातच्या एकाने मित्रासाठी सूट घातला. देशाची सध्याची स्थिती पाहता आपल्याला एकतेची गरज आहे. समता, वीरता आणि एकता हेच देशाच्या परिवर्तनाचे सूत्र आहे. आपण देशातील कोणत्याही भागात राहू परंतु संपूर्ण देश विविध समस्यांनी ग्रासला आहे. एकमेकांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी मार्गदर्शन करायला नाही तर तुमचं मार्गदर्शन घ्यायला आलोय. सध्या व्हॉट्असअप विविध मेसेज व्हायरल केले जातात. काँग्रेस, नेहरू, गांधी यांच्याबाबत गैरसमज पसरवणारे मेसेज सर्वांना येतात. मुघलांच्या राज्याला ब्रिटीशांनी संपवले, ब्रिटीशांनी २०० वर्ष देशावर राज्य केले. स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास पाहिला तर पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातून सर्वाधिक बलिदान लोकांनी दिले. क्रांती फक्त बॉम्ब पिस्तुलाने होत नाही असं भगतसिंग यांनी म्हटलं होते. शहीद भगतसिंग यांना फाशी देताना गांधीनी काही केले नाही असा मेसेज तुम्ही वाचला असेल. इंग्रजांच्या २०० वर्षाची हुकुमत संपली त्यामागची ताकद होती सत्य. सत्याच्या ताकदीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसामान्य जनतेला एकजूट करते. महिला, आदिवासी, शेतकरी, कामगार आंदोलन होत होते त्या सर्व आंदोलनाला एकजूट करून महात्मा गांधींनी सत्याची ताकद बनवली आणि इंग्रजांना पराभूत केले असंही कन्हैया कुमार यांनी म्हटलं.

देशाचं स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न

सध्या सोशल मीडिया हत्यार आणलंय, नाव सोशल मीडिया पण काम असोशल मीडिया, इतिहास घडवला जात नाही तर इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वातंत्र्य होण्याचं उद्दिष्ट काय? स्वातंत्र्य म्हणजे विचारांनी स्वातंत्र्य होणे, सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे, स्वातंत्र्य म्हणजे इथे बसलेला सर्वसामान्य आणि व्यासपीठावर असलेले आमदार, खासदार यांना एक मतच असते. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. सरकारचे काम नागरिकांना दिलासा देणे आहे. परंतु हळूहळू आपले स्वातंत्र्य हिरावण्याचे काम होतंय. संत तुकाराम, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी महाराष्ट्रात जन्म घेतला. क्रांतीकारी अण्णाभाऊ साठे जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंत ही भूमी क्रांतीकारी भूमी आहे असंही कन्हैया कुमार यांनी सांगितले.

ही संविधानाची ताकद

मी महात्मा गांधींचा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग यांचा मी ऋणी आहे. त्यांनी इंग्रजांविरोधात लढून आम्हाला स्वातंत्र्य दिले. लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, इंदिरा गांधी मी त्यांचा ऋणी आहे कारण जे स्वातंत्र्य आम्हाला पूर्वजांनी दिले. ते स्वातंत्र्य या नेत्यांची टिकवून ठेवले. त्यासाठी एक सर्वसामान्य तरूण, ज्याची आई अंगणवाडी सेविका आहे. तो हातात माईक घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर भाषण करतोय. ही संविधानाची ताकद आहे असं कौतुक कन्हैया कुमार यांनी केले.

देशासोबत गद्दारी करण्याचा भाजपाचा इतिहास

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे पसरवले जाते, सत्याला नाकारले जातंय. हे इतिहास बनवू शकत नाहीत. देशाचे पंतप्रधान इतिहासात नापास झालेत. मी भाजपात नाही, त्यामुळे खोटे बोलत नाही. जी पिढी आपला इतिहास विसरते, इतिहासही त्या पिढीला विसरून जातो असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यासाठी इतिहास बनवू शकत नाही म्हणून इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्याच्या आधारे इमारत उभी करण्याचा प्रय़त्न करतायेत. कारण त्यांचा इतिहास खराब आहे. देशासोबत गद्दारी करण्याचा इतिहास आहे. इंग्रजांविरोधात जे लढाई करत होते. त्यांची जासूसी करण्याचे काम जे करत होते हा त्यांचा इतिहास आहे. मी जितक्या क्रांतिकारकांची नावे घेतली त्यातील एकही भाजपाशी निगडीत नाही. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा संबंध काँग्रेसशी आहे. ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिले त्या पक्षाचे तुम्ही सदस्य आहात असं सांगत कन्हैया कुमार यांनी भाजपावर जहरी टीका केली.

हा कसला विकास?

देशातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जाते. देशातील समस्या काय हे आपल्याला जाणून घ्यायला हवे. जनतेकडून कर घेतात आणि मित्राचे कर्ज माफ करतात. आम्ही मेहनतीचे पैसे बँकेत जमा करतो, परंतु १२ लाख कोटींचे कर्ज मित्रांचे माफ केले जाते. सातत्याने देशातील शिक्षणाचे बजेट कमी केले जात आहे. दिल्लीत २० हजार कोटींचे महल बनवलंय, पण हॉस्पिटल बनवायला पैसे नाही. रोड बनवायला घेतात पण रोड पूर्ण होण्याआधी टोल घ्यायला सुरुवात करतात. कार खरेदी करताना रोड टॅक्स घेतला जातो, त्यानंतर रस्त्यावर टोल भरावा लागतो. हा कसला विकास? प्रत्येकावर कर लादला जातोय. शिक्षण, रस्ता, आरोग्य सर्वांवर कर घेतला जातो आणि आत्मनिर्भर बना असं म्हटलं जाते असा टोला कन्हैया कुमारने केंद्र सरकारला लगावला.

Web Title: Attack on BJP on allegations of nepotism; Kanhaiya Kumar Target Narendra Modi, Amit Shah in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.