आज अयोध्येत झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर काल रात्री मीरा रोड येथे सनातन यात्रा काढण्यात आली होती. मात्र या यात्रेवेळी गोंधळ होऊन काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन यात्रेत सहभागी वाहनांवर हल्ला केल्याचे समोर आले होते. या घटनेची आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबत सोशल मीडियावरून माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपींना ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा सक्त इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, सनातन यात्रा काढणाऱ्या लोकांनी केलेल्या आरोपानुसार, ते ध्वज घेऊन शांततेने जात होते. मीरा-भाईंदरमधून जात असताना अचानक यात्रेत निघालेल्या वाहनांसमोर काही विशिष्ट समाजाचे लोक उभे राहिले. त्यांनी वाहनांवर हल्ला केला. वाहनांवरील ध्वज हिसकावून फाडण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, २१ जानेवारीच्या मध्यरात्री १२ नंतर ही घटना घडली.