मुंबई / नवी मुंबई / पालघर : केंद्र सरकारने वाहतूकदारांशी संबंधित कायद्यात केलेल्या बदलांना विरोध करण्यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख वाहतूकदारांनी वाहतूकदारांनी आंदोलने, निदर्शने, रास्ता रोको केला. तीन दिवस पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी विविध वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला. राज्यात सुमारे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला.
नवी मुंबईत आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला, तर पालघरमध्ये पोलिसांची गाडी फोडण्यात आली. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यातील वाहतूकदार प्रतिनिधींची उद्या (मंगळवारी) बैठक होणार आहे. बंदमुळे पुढील दोन दिवसांत दूध, भाजीपाला, धान्य - कडधान्यासह सर्व मालवाहतुकीला, इंधन पुरवठ्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
न्याय संहितेतील बदलांमुळे अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनचालकांना दहा वर्षे तुरूंगवास आणि सात लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. त्याला वाहतूकदारांचा विरोध आहे. अपघातानंतर अनेकदा गर्दी, मारहाणीच्या भीतीने वाहनचालक पळून जातो, असा दावा करून शिक्षा आणि दंडाच्या रकमेला विरोध करत एक दिवसाचा बंद पुकारला होता.
पाच लाख वाहने उभी - राज्यात पाच लाख ट्रक उभे असून, मालवाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने व्यक्त केली. - केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेत तोडगा काढावा, असे आवाहन कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी केले आहे. वाहतूकदारांनी संयम पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
सायन - पनवेल महामार्ग रोखलाकळंबोली सर्कलवर रास्ता रोको केल्याने चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिस कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलकांची वाढती संख्या पाहता पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला. दीड तासानंतर आंदोलकांना बाजुला करण्यात पोलिसांना यश आले. पनवेल ते कळंबोली सर्कल, मुंब्रा महामार्ग, पुणे येथून पनवेल येणारा मार्ग, जेएनपीटी - कळंबोली महामार्ग, मुंबई ते पनवेलदरम्यान येणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लहान पेट्राेल पंप सकाळीच बंद पडतीलराज्यात सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल, डिझेल वितरणावर होणार आहे. रविवारी अनेक पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेल घेतले नाही. तसेच सोमवारी सुरू झालेल्या संपामुळे कित्येक ठिकाणी पेट्रोल, डिझेल पोहोचू शकले नाही. पेट्रोल मिळालेच नाही तर लहान पेट्रोलपंप सकाळी आणि मोठे पेट्रोलपंप दुपारपर्यंत बंद पडतील. - चेतन मोदी, पेट्रोल डीलर्स असोसिएशन
...तर शाळा बंद राहतीलकाही शाळा मंगळवारी सुरू आहेत तर बुधवारी सर्व शाळा सुरू होणार आहेत. ट्रक चालकांच्या संपामुळे मंगळवारी शाळेच्या बस चालकांना डिझेल उपलब्ध न झाल्यास त्या बंद राहतील. तसेच या संपाला पाठिंबा देण्याबाबत चर्चासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. - अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन
हिंसक वळण, दगडफेक- वाहनचालकांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी पोलिसांवर हल्ला करत दगडफेकीची घटना जेएनपीटी मार्गावर घडली. यात काही पोलिस जखमी झाले. पोलिसांनी ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे परिसरात काही काळ तणाव होता.- उलवे येथे वाहन चालकांनी रास्ता रोको केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. पाेलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. - आंदोलकांनी पोलिसांवर तसेच रस्त्यांवरील अन्य वाहनांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले.
पर्यटक अडकले -- मुंबई - अहमदाबाद मार्गावर चिंचोटी व बाफाने फाटा येथे वाहतूकदारांनी रास्ता रोको केल्याने वाहतूककोंडी झाली. नववर्ष साजरे करून येणाऱ्या पर्यटकांचे हाल झाले.- चिंचोटी नाका परिसरात आंदोलन केल्याने काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी वाहने थांबवून ठेवली. जी थांबत नव्हती, त्या चालकांना दगड, लाठ्यांचा धाक दाखवून हुसकावून लावले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली.