मुंबई : लातूरच्या पानगाव येथे एका पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. ठाणे येथे एका महिला वाहतूक पोलिसाला शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने मारहाण करून विनयभंग केला. मुंबईच्या कांदिवली परिसरात दोन पोलिसांना दोघांनी तर नाशिक येथे एका पोलिसाला तिघा दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की केली.महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करून विनयभंग करणारा धर्मवीर नगर येथील शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याची रवानगी शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर, हा पक्षाचा पदाधिकारीच नाही, असे सांगत शिवसेनेने हात झटकण्याचा प्रयत्नही केला आहे. नितीन कंपनी सिग्नल येथे गुरुवारी सकाळी महिला हवालदार वाहतुकीचे नियमन करीत होती. त्याच वेळी तीनहात नाका बाजूकडून स्कॉर्पिओतून कालगुडे आला. तो मोबाइलवर बोलत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास येताच त्याला थांबण्याचा इशारा महिला हवालदाराने केला. गाडी थांबताच त्यांनी लायसन्सची मागणी केली. तेव्हा शिवीगाळ करून ‘कशाला पाहिजे लायसन्स’, असा प्रतिसवाल करून कालगुडे गाडी पुढे नेऊ लागला. तरीही, महिला हवालदाराने गाडीमागे धावून त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावर, चिडलेल्या कालगुडेने गाडी थांबवून महिला हवालदाराला मारहाण केली. याप्रकरणी दुपारी कालगुडे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नोकरावर हल्ला, विनयभंग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आदी कलमांखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. हा प्रकार करणारा पक्षाचा पदाधिकारी नाही, असे टष्ट्वीट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.कालगुडे याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी दुपारीच संपली. मात्र लागलीच नौपाडा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी विक्रांत पाटील यांनी त्याच्यावर ११० नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. नौपाडा पोलिसांनी त्याची गाडीही जप्त केली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांना सुरक्षा देण्याची वेळखाकी वर्दीवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ ओढवली आहे. २०१४मध्ये १९७ पोलिसांच्या वर्दीवर हात टाकल्याप्रकरणी २४३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्या तुलनेत २०१५मध्ये ६४ गुन्ह्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षी २०१५मध्ये पोलिसांवरील हल्ल्याचे २०१ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले. यापैकी अवघ्या १८८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती.कांदिवलीमध्ये दोन पोलिसांना मारहाणकांदिवलीच्या महावीर नगर परिसरात शुक्रवारी पहाटे ३च्या सुमारास गस्तीवरील कांदिवली पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत साळुंखे व त्यांच्या व्हॅन चालकाला दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एका मोटारीने साळुंखे यांच्या व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साळुंखे यांनी त्या मोटारीतील दोघांना हटकले. त्याचा रागाने त्या दोघांनी शिवीगाळ करीत तेथून पळ काढला. साळुंखे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातच चालकाचा ताबा सुटल्याने ती मोटार रस्त्याकडील एका कठड्याला धडकली. पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, मोटारीतील दोघांनी साळुंखे आणि व्हॅन चालक पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी नीरज शर्मा (३२) आणि सुनील शर्मा (३१) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरुच
By admin | Published: February 27, 2016 4:51 AM