- लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर (अहमदनगर) : गोवंश हत्या होत असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्यातील कुरण येथे कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व त्यांच्या पथकावर शुक्रवारी सुमारे पाचशे लोकांच्या जमावाने हल्ला केला. पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात ओमासे व पोलीस नाईक अशोक मुरलीधर सुपे यांना जबर मारहाण झाली. सुपे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नासिर शेख यांच्या डाळिंबाच्या मळ््यात कत्तलीच्या हेतूने आणलेली गोवंश जनावरे ताब्यात घेण्यासाठी ओमासे हे फौजफाट्यासह गेले होते. तेथे शेतात त्यांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे दिसली. संबधितांवर कारवाई सुरु करताच पोलिसांच्या कारवाईविरोधात संपूर्ण गाव एकवटले. त्यांनी कारवाईत अडथळा आणला. पोलीस व कुरण ग्रामस्थांत वाद झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने गावातील रस्ता अडवून पोलिसांना बाहेर जाऊ दिले नाही तर संगमनेर शहरातून मदतीसाठी आलेल्या पोलिसांनाही गावात येवू दिले नव्हते.