सोलापूर : विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी येथील इंदिरा गांधी स्टेडिअमवर नरेंद्र मोदी सभेला जात असताना त्यांच्या ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया(एनएसयूआय)च्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नरेंद्र मोदी यांचा ताफा सभेच्या ठिकाणी जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. तर ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तुटून पडले. पोलिसांनी लाठीमार करीत आंदोलकांची धरपकड केली. तसेच, काळे झेंडे दाखवणाऱ्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला आहे.
बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.