जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणार्या मंडळ अधिकारी व तलाठय़ांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता सावखेडा बु.गावाजवळ घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक अर्जुन आत्माराम पाटील व चालक सुभाष पुंडलिक पाटील (दोन्ही रा.सावखेडा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. गिरणा नदी पात्रातून होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार गोविंद शिंदे यांनी मंडळ अधिकारी जगराम दांडगे, तलाठी किशोर रासने, उदय निंबाळकर, आशिष वाघ यांचे एक तर तलाठी संदीप ढोबाळ, डी.एस.लवने व बेंडाळे यांचे दुसरे पथक तयार केले होते. एक पथक गावातून तर दुसरे पथक बाहेरुन जात होते. दांडगे यांच्या पथकाला सावखेडा गावातच शाळेजवळ ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ पी २00४) दिसले. ते थांबविले, पण मालक अर्जुन पाटील यांनी दांडगे यांच्याशी हुज्जत घातली. नंतर वाद वाढला. तितक्यात चालकाने ट्रॅक्टर दांडगेंच्या दिशेने नेले. यात दांडगेंनी बचाव केला, मात्र मागील चाकात त्यांची चप्पल अडकली. यानंतर दांडगे यांनी पोलीस पाटील तसेच तालुका पोलिसांशी संपर्क साधून कर्मचारी बोलावून घेतले. पोलिसांनी ट्रॅक्टर व चालक-मालकाला ताब्यात घेऊन दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. |