मुंबई : आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.नाशिक येथील जाहीरसभेत शनिवारी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यानी टिष्ट्वटरच्या माध्यमातून खुलासा केला. ‘भारतमाता की जय’च्या वक्तव्यावरून माध्यमातील काही घटक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या घोषणेचा आणि धर्माचा काही एक संबंध नाही. १७ मार्च रोजी माहीम येथील दर्ग्यात पाचशेहून अधिक मौलवींनी तिरंगा फडकाविला आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. हजरत मकदूम फतेह अली माहिमींच्या ६०३व्या उरूसात मान्यवर मौलवींनी केलेल्या या ध्वजारोहणाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांना आम्ही सलाम करतो, असेही आपण भाषणात म्हटले होते. मात्र हा सारा भाग माध्यमांनी वगळल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.‘भारतमाता की जय’ ही निव्वळ एखादी घोषणा नाही; हीच घोषणा देत लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही हजारो जवान याचा घोष करत स्वत:चे सर्वस्व देशासाठी अर्पण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणी ‘जय हिंद’ म्हणो अथवा ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंदुस्थान’ म्हणो, कोणती घोषणा दिली जाते हा अजिबात वादाचा मुद्दा नाही. मात्र जर कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नसेल, म्हणणार नाही अशी भूमिका घेत असेल तर त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. लांगुलचालनालाही काही मर्यादा घालावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.‘भारतमाता की जय’ला विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही. समाजात दुही माजवायची आहे, समाजात तेढ निर्माण करायची आहे, अशीच मंडळी घोषणेच्या नावाखाली वाद निर्माण करीत आहेत आणि कोणत्याही स्थितीत अशा लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
‘भारतमाता की जय’वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 04, 2016 3:11 AM