ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पात फसवणूक झाल्याचा आरोप करीत मालाड येथील एका युवकाने गुरुवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत या युवकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
काचपाडा, मालाड (पश्चिम) येथील व्ही. पिल्लई (वय ३२ वर्षे) या व्यक्तीने सायंकाळच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या युवकाने पिशवीतील रॉकेलची बाहेर काढून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न चालविलेला असतानाच तिथे उपस्थित असणा-या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. झोपू योजनेत फसवणूक झाल्याची तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.
तसेच मुख्यमंत्र्यांचीही भेट मिळत नसल्याचाही आरोप या यवकाने केला. अचानक सुरु झालेल्या या गोंधळामुळे मंत्रालय प्रवेशद्वारासमोर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.