पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.अजय उर्फ शहेनशहा रंगप्पा म्हेत्रे (वय २४), बाळू उर्फ चुन्या रंगप्पा म्हेत्रे (वय २३), शंकर तायप्पा नाईक (वय २३) आणि सचिन मोहन म्हस्के (वय २२, सर्व रा. ताडीवाला रस्ता) अशी शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी विनायक रमेश मेमाणे यांनी फिर्याद दिली होती. दि. २४ मार्च २०१२ रोजी मध्यरात्री ताडीवाला रस्ता परिसरात ही घटना घडली होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी सचिन म्हस्के याच्या घरात तोडफोड झाली होती. तोडफोड करणाऱ्यांपैकी जो कोणी दिसेल त्याला सोडायचे नाही, असे आरोपींनी ठरविले होते. दि. २४ मार्च रोजी फिर्यादी आणि त्याचा मित्र दुर्वेश त्याच्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडविले. दोघांशी हुज्जत घालून आरोपींनी दुचाकीच्या डिकीतून कोयते काढून विनायक आणि दुर्वेश याच्यावर वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. आरोपींवर सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. खटल्यात जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. न्यायालयाने चौघांची मोक्कामध्ये निर्दोष मुक्तता केली. मात्र, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरत चौघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
खुनाचा प्रयत्न; चौघांना सक्तमजुरी
By admin | Published: April 29, 2016 1:28 AM