चांदवड (जि. नाशिक) : देशातील अल्पसंख्य जैन संस्थांना अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्टिट्यूट प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संस्थापक शांतीलाल मुथा यांनी रविवारी दिली.येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमाच्या प्रांगणात रविवारी झालेल्या एकदिवसीय राज्य अधिवेशनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय अध्यक्ष वल्लभ भन्साळी, राज्यअध्यक्ष अजितकुमार सुराणा, नेमिनाथ जैन संस्थेचे अध्यक्ष संपतलाल सुराणा, बेबीलाल संचेती, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, मोहनलाल चोपडा, दलिचंद जैन, जवाहरलाल आबड आदि उपस्थित होेते.देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना एकत्र करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी २००३मध्ये भारतीय जैन संघटनेअंतर्गत कार्यरत असलेल्या फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून बऱ्याच समस्या दूर केल्या जात आहेत, असे शांतीलाल मुथा यांनी सांगितले. प्रवेशाबाबत वक्त्यांंनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.प्रवेशासाठी टक्केवारीची अट असल्याने अल्पसंख्यकांना अडचणी येत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वल्लभ भन्साळी यांनी सांगितले. या अडचणी सोडविण्यासाठी फेडरेशन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात तंत्रज्ञान, मूल्यशिक्षण, संविधान, शेती विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, क्रीडा व योग आदि विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार असल्याची माहितीही भन्साळी यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन आकाशात फुगे सोडून करण्यात आले. प्रास्ताविक राज्य अध्यक्ष अजितकुमार सुराणा यांनी, तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. तुषार चांदवडकर व संगीता बाफना यांनी केले. संस्थेची माहिती डॉ. महेश संघवी, प्रा. संचेती यांनी दिली. यावेळी बेबीलाल संचेती, प्रा. कैंजन संघवी, दलिचंद जैन यांची भाषणे झाली. एकदिवसीय अधिवेशनास देशभरातील एक हजार प्रतिनिधी उपस्थित होेते. (वार्ताहर)
जैन संस्थांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 4:37 AM