पुणे : पोटच्या मुलीला विष पाजून तिचा आईने खून केल्याची घटना वारज्यातील शुभांगम सोसायटीत गुरुवारी घडली. मुलीला विष पाजल्यानंतर घरामधून माहेरी निघून गेलेल्या महिलेनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. नैराश्यामधून तिने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अक्षिता संजय सावळे (वय १ वर्ष ९ महिने) असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई अनिता (वय २३) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय नारायण सावळे (वय ३०, रा. शुभांगम सोसायटी, तिरुपतीनगर, वारजे नाका) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि अनिता एकत्र राहात असून, त्यांंना अक्षिता नावाची मुलगी आहे. संजय एका कंपनीमध्ये विभागीय व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. गुरुवारी संध्याकाळी त्यांची पत्नी अनिताने अक्षिताला विष पाजून तसेच गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर घरामध्ये एका वहीवर चिठ्ठी लिहून ठेवली. ‘‘मला जगण्याची इच्छा नाही, माझ्या मागे माझ्या बाळाची परवड होऊ नये म्हणून तिलाही माझ्याबरोबर नेत आहे, मला माफ करा.’’ असे तिने लिहून ठेवले होते. शेजारच्या खोलीत पंख्याला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेली अनिता घर बंद करून बाळाला तेथेच टाकून माहेरी निघून गेली. तिच्या आईला तिने ही हकीकत सांगितली. तिच्या आईने अनिताच्या जावेच्या आईला ही माहिती दिली. शेजारीच राहात असलेली अनिताची जाऊ पल्लवी हिने घर उघडून पाहिले असता अक्षिता पाळण्यात निपचीत पडलेली दिसली.दरम्यान, संजय घरी आल्यानंतर अक्षिताला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. डॉक्टरांनी त्यांना अक्षिताचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. येरवड्यातील खासगी रुग्णालयात अनिता दाखल असून, डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात येणार आहे. अक्षितावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलीला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: February 06, 2016 1:53 AM