ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका तरुणाने मानेवर व हातावर चाकूने व ब्लेडने वार करून, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. गोरेगावात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. वनराई पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत, रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. विक्रांत पीयूष दुबे (२३) असे त्याचे नाव असून, त्याच्या वडिलांनी उत्तर प्रदेशातून पोलिसांना हा प्रकार कळविला होता. काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येपोटी त्याने हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विक्रांत हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईला आहे. गोरेगावमध्ये तो फ्लॅट भाड्याने घेऊन राहतो. शुक्रवारी मध्यरात्री त्याचे वडील पीयूष दुबे यांनी वनराई पोलीस ठाण्यात फोन करून आपला मुलगा आत्महत्या करणार आहे, त्याला वाचवा, असे सांगत, तो राहत असलेले ठिकाण सांगितले.
त्यानंतर, पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर सहकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून प्रवेश केला. बाथरूमचा दरवाजाही आतून बंद होता, विक्रांत उघडत नसल्याने पोलिसांनी तो दरवाजाही तोडला. त्या वेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याच्या मानेवर त्याने ब्लेडने वार केले होते आणि एका हाताची नस कापली होती. पोलिसांनी तातडीने त्याला परिसरातील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्या पालकांना बोलाविण्यात आले आहे.