मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. याचबरोबर, महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावरही दीपक केसरकर यांनी सावध भाष्य केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, "आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे बोलले जाते आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की, सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. ठाकरे कुटुंबीयांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात, ते यामुळे दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे."
याचबरोबर, मला कोणीही सांगितले नव्हे तरी मी स्वतःच्या संपर्काने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क सुरु झाला. त्यानंतर त्यांची भेटही झाली. त्यावेळी मला पंतप्रधानांबाबत हे कळाले की कुटुंब प्रमुख कसा असावा? त्यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेले प्रेम प्रतित होत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो. त्याचवेळी ते आपल्यापदाचा त्याग करणार होते, असा गौप्यस्फोट सुद्धा दीपक केसरकर यांनी केला.
यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या याबाबत कानावर घालणार होते. ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मलाच माहिती होती. मोदी आणि ठाकरे यांच्याच संवाद सुरु होता. पण, मधल्या काळात 12 आमदारांचे निलंबन झाले. नंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली. मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. यातील एकही शब्द खोटा असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन, असेही दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याबाबत दीपक केसरकर म्हणाले, पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालावरुन समजेल. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ झाला तरी चालेल, पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखणे गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जातोय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरीम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल.