Sanket Bawankule Car Accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातील अनेक प्रकरणं ही हायप्रोफाईल असल्याची समोर आली आहेत. अशातच नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने विवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन लागलीच घरी सोडण्यात आलं. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावरुन विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.
नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. रविवारी नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने वाहनांना धडक दिली होती. अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते अशी माहिती पोलिसांनी दिली. यात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे, असेही पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून कारण नसताना चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट केलं जात असल्याचे म्हटलं आहे.
"या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या प्रकरणातील तथ्ये समोर आणली आहेत. आता ज्याप्रकारे त्याचं राजकारण केलं जात आहे ते मला चुकीचे वाटत आहे. बावनकुळेंना टार्गेट करण्याचा विचार करुन राजकारण करणं ठीक नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, या घटनेवेळी चालक अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार तिघांनाही चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशीनंतर चालकाला अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला. अपघातानंतर संकेत याच्या गाडीची कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं. कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि तिसरी व्यक्ती रोनित चित्तमवार मागच्या सीटवर बसले होते, असेही पोलिसांनी सांगितले.