पुणे : पोलीस दलात भरती झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सामाजिक, आर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टी प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्स सुरु करण्यात येत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़. पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील सभागृह व स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस या प्रशिक्षण कोर्सचे जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले़. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. जयस्वाल यांनी सांगितले की, मुंबई तंदुरुस्त नसलेल्या पोलिसांसाठी आम्ही एक महिन्याचा कोर्स आयोजित केला होता़. त्याचा चांगला परिणाम दिसून आला़ पोलिसांपुढील आव्हाने वाढली आहेत़. निमलष्करी दलाच्या धर्तीवर पोलिसांसाठी प्रशिक्षण व संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे़. पोलीस निरीक्षक ते विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रात ३ कोर्स सुरु करण्यात आले आहेत़ .या प्रशिक्षणासाठी निधीची कमतरता पडणार नाही. तसेच त्यात खंडही पडणार नाही़. सोशल मीडियाचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे़, याला कसे हाताळावे, पोलिसांच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे़ घडणाऱ्या घटनांना सामोरे जाताना पोलिसांनी कोण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, याचा बेंचमार्क निश्चित करणे, पोलिसांची कार्यक्षमता, त्यांचे आकलन करण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणणे अशी उद्दिष्टे ठेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे़. प्रशिक्षण हा पोलिसांवर असलेला तणाव कमी करण्याचा एक भाग आहे़.
संशोधनासाठी खासगी व्यक्तींचे स्वागतपोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करुन आणखी चांगली सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन होण्याची आवश्यकता आहे़. त्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर खासगी व्यक्ती संशोधन करणार असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल़. संशोधनासाठी अनेक विषय आहेत़ त्यासाठी आवश्यक तो डाटा पुरविण्यात येईल़. कोणत्या विषयावर संशोधन करायला हवे हे निश्चित करण्यासाठी समिती असणार आहे़. यावेळी सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़.