अहमदनगर - राज्यसभा निवडणुकीचं वारं जोरदार वाहत असताना विधान परिषदेच्या १० जागांवरूनही रणकंदन माजलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपाने प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
यातच पंकजा मुंडे(BJP Pankaja Munde) यांना उमेदवारी न दिल्याने अहमदनगर येथे मुंडे समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंकुंद गर्जे असं या समर्थकाचे नाव आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावना अनावर झाल्याने गर्जे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
विधान परिषद निवडणुकीत पक्षाने गोपीनाथ मुंडेंच्या दोन समर्थकांना उमेदवारी दिली. पण, पंकजा मुंडेंना डावललं आहे. विधानपरिषदेत संधी न मिळाल्याने पंकजा मुडेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. ताई नाही, तर भाजपा नाही अशा आशयाची बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
भाजपा कार्यालयावरही हल्ल्याचा प्रयत्नभाजपाने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपाच्या कार्यालयात आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी हे विरोधकांचे काम आहे, हल्लेखोर भाजपाचे किंवा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे परभणी आणि गंगाखेड तालुक्यातील मुंडे समर्थकांनी ताई नाही, तर भाजपा नाही असे बॅनर सोशल मीडियात व्हायरल केले आहेत.
राज्यातील राज्यसभा आणि विधानपरिषद दोन्ही निवडणुकीत भाजपाच्या केंद्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. माझे काही मागणे नाही, पण संधी मिळाली तर सोने करू, असे जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. विधानसभेत परळी येथून पराभव झाल्यापासून राज्यातील राजकारणातून त्यांना बाजूला करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीही पंकजा मुडेंना उमेदवारी न दिल्याने भाजपावर टिका केली आहे.