पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे शीर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते घेऊन फिरणारा क्रूरकर्मा रामचंद्र चव्हाण याच्यावर शनिवारी कोर्टाच्या आवारात महिला कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी अटक केलेल्या चव्हाण यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी काही सामाजिक कार्यकर्त्या महिला न्यायालय परिसरात जमा झाल्या होत्या. शुक्रवारच्या घटनेप्रकरणी त्या संताप व्यक्त करीत होत्या. न्यायालयाने चव्हाण यास पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर आणले. चव्हाणला गाडीत बसवत असतानाच महिला कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिलांचा संताप पाहून पोलिसांनी तातडीने त्याला गाडीत बसवून नेले. न्यायालयाने चव्हाणला १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. चव्हाण याने त्याची पत्नी सोनाबाई (५०) यांचा शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या अंगणात खून केला होता. त्याने क्रूरपणे त्यांचे शीर व हात-पाय धडावेगळे केले होते. (प्रतिनिधी)
पुण्यातील क्रूरकर्म्यावर महिलांचा हल्ल्याचा प्रयत्न
By admin | Published: October 11, 2015 3:56 AM