संगमनेर (अहमदनगर) : महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर जरूर कारवाई करा. पण, सहकार मोडू नका, असे प्रतिपादन माजी वनमंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. संगमनेरमध्ये मंगळवारी अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. उल्हास पवार होते. या वेळी गुलाबराव शेळके, डॉ. हमीद दाभोलकर, अॅड. मुक्ता दाभोलकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. या वेळी कदम, दाभोलकर व शेळके यांना गौरविण्यात आले.स्व. थोरात व दाभोलकर यांचे काम एकमेकांशी पूरक होते. जादूटोणा कायदा ही शासनाची देणगी असून, २०० केसेस दाखल झाल्या आहेत. जातपंचायत मोडण्याचे मोठे काम नगर जिल्ह्यात झाले. अंनिसचे काम वाढविणे हेच दाभोलकर यांच्या खुनाला उत्तर असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. हमीद दाभोलकर यांनी २९ महिने उलटूनही स्व. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लागत नाही. कॉ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या होऊनही ‘मॉर्निंग वॉक’ला येण्याचे आव्हान दिले जाते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचे प्रयत्न
By admin | Published: January 13, 2016 1:21 AM