पुणे : पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. पोलीस मित्र अॅपद्वारे दोन लाख नागरिकांशी पोलीस दल जोडले गेले आहे. दीड लाख पोलिसांना त्यांची मोठी मदत मिळत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी पुणे येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील नागरिकही पोलिसांच्या कामात सहभाग घेत आहेत. केवळ पुरुषच नाही, तर महिलाही पोलिसांना गस्त घालण्यामध्ये मदत करीत आहेत. विशेषत: मुंब्रा, भिवंडीसारख्या शहरांमध्येही महिलांचा मिळणारा सहभाग विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सुरक्षेसाठी प्रतिसाद अॅप सुरू करण्यात आले असून, त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करताना त्यांनी ग्रामीण भागामधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. पोलिसांची गस्त आगामी काळात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘आरएफआयडी’ या यंत्रणेचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शहरामधील संवेदनशील ठिकाणे, विशेष व्यक्तींची निवासस्थाने, बॅँका, एटीएम सेंटर्स, मॉल्स, महत्त्वाची ठिकाणे अशा ठिकाणांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ काढून तेथे एक मशिन बसवले आहे. या मशिनमध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसवण्यात आली आहे. गस्तीवरील पोलीस गस्ती पॉइंट्सवर गेल्यावर तेथे बायोमॅट्रिक पद्धतीने पंच केला जातो. त्यामुळे नियंत्रण कक्षाला कोणता पोलीस किती वाजता कुठे गस्त घालून गेला, याचा तपशील मिळतो. (प्रतिनिधी)‘व्हायरल’ झालेले छायाचित्र खरे नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे गप्पा मारत बसलेले असताना काही अंतरावर पोलीस महासंचालक उभे असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर होते. हे छायाचित्र बनावट असल्याचे प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले. गणवेशावर तलवार लावलेली असेल, तर आम्ही कोणत्याही खोलीत जात नाहीत. परेड असेल तेव्हाच तलवार लावली जाते. त्यामुळे हे छायाचित्र बनावट असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.गुन्ह्यांचे प्रमाण घटलेराज्यातील गुन्ह्यांचा आलेख खाली आला असून, सोनसाखळी चोरी, जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये ४३ टक्क्यांनी घट झाली असून, खुनाचे गुन्हेही घटले आहेत. लोकांनी पुढे येऊन काम केल्यास ‘कोअर पोलिसींग’चा समाजाला फायदा होईल. शासनानेच सर्व गोष्टी कराव्यात, या मानसिकतेमधून बाहेर येण्याची गरज असून, लोकांनी सुरक्षेबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.राज्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकूण मर्यादेच्या ३० टक्केही रस्ते वाहनांसाठी मोकळे नसतात. रस्ते तसेच पदपथांवरची अतिक्रमणे दूर करण्याची, तसेच रस्त्यांची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे दीक्षित म्हणाले.सीसीटीव्हींचा अधिकाधिक वापर हा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपयोगाचा ठरत आहे. मुंबई रेल्वेकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्यांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हींचा पुरावा म्हणून वापर करायला सुरुवात केल्याने जाबजबाब लवकर पूर्ण होतात. महिला तक्रारदारांना पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात यावे लागत नाही. महिलांबाबतच्या गुन्ह्यांच्याबाबतीत शक्य असेल तेथे २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सिंधुदुर्ग, सोलापूर, गडचिरोली, यवतमाळ अशा ग्रामीण भागांतही लवकर आरोपपत्र गेल्याने आरोपींना तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षा झाल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर ‘सुमोटो’ कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
लोकाभिमुख पोलीस दलासाठी प्रयत्न
By admin | Published: June 14, 2016 3:07 AM