नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणानं वातावरण तापवलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आणि त्याची झळ लोकप्रतिनिधींना बसली.राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली. त्यात शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर खासदारकीचा राजीनामा दिला. त्यावरून आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार हेमंत पाटील यांना समन्स बजावून लोकसभेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याठिकाणी ते विजयी झाले. परंतु २०२२ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीत हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच मराठा समाजानं आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनाही जाब विचारण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. पद येतील आणि जातील परंतु समाज कायम सोबत राहील असं विधान करत त्यांनी खासदारकीचा त्याग करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे पाठवले होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केल्यापासून हेमंत पाटील संसदीय कामकाजापासून दूर झाले होते. परंतु आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत पाटील यांना समन्स जारी करत येत्या ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहण्यास सांगितले आहे. हेमंत पाटील यांनी २९ ऑक्टोबरला खासदारकीचा राजीनामा दिला होता त्याचसोबत ३१ ऑक्टोबरला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरही पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते.
राजीनामा पत्रात काय म्हणाले होते हेमंत पाटील?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. दरम्यान, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाना देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले होते.आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठींबा आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भावना समजून घेवून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.