पुणे : कोपर्डी अत्याचार व आरक्षणाच्या प्रश्नावर भगव्या झेंड्याखाली एकवटलेल्या लाखो मराठा समाजबांधवांनी सैनिकी शिस्तीत एक शब्दही न बोलता विद्येचे माहेर असलेल्या पुणे शहरात रविवारी इतिहास घडविला. मुठेचा काठ अन् शहरांतील पेठांसह सगळीकडेच मराठा क्रांती मूक मोर्चाचा जनसागर लोटला होता. अनेक वर्षांनंतर पुण्याने असे वादळ अनुभवले. सकाळी सहापासूनच शहर आणि ग्रामीण भागातून मोर्चेकरी पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली. डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याजवळ ही गर्दी एकवटली. सात वाजताच पुतळ्याजवळील खंडूजीबाबा चौक गर्दीने ओसंडून वाहत होता. या चौकाजवळ एकवटणारे सर्व रस्ते चार किलोमीटरपर्यंत गर्दीने व्यापले होते. साडेदहा वाजता युवतींनी छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, अल्पना चित्रपटगृह, नाना चावडी, क्वार्टर गेट, समर्थ पोलीस ठाणे, लाल देऊळ, नवी जिल्हा परिषदेमार्गे मोर्चा दुपारी बरोबर सव्वाबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. पुण्याच्या उपनगरांमधून आलेले कार्यकर्ते येथे जमा झाल्यामुळे मोर्चाला विराट स्वरूप आले. यावेळी प्रतीक्षा गव्हाणे या युवतीने मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. मोहिनी पलांडे, अर्चना भोर, सुचेता भालेराव यांची भाषणे झाली. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. त्यानंतर मोर्चा विसर्जित झाला. चौकाचौकांमध्ये या मोर्चाचे सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, विविध समाजांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मोर्चामुळे पुणे शहरात येणारे सर्व महामार्ग वळविण्यात आले होते. तर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तसेच मोर्चाच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावले होते. राजकीय नेत्यांची हजेरीपुण्यातील ऐतिहासिक मोर्चात मराठा समाजातील राजकीय नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. खासदार अनिल शिरोळे, उदयनराजे भोसले, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जगदिश मुळीक, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाई जगताप, महापौर प्रशांत जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. तसेच धावपटू ललिता बाबर, सुनेत्रा पवार, रूपाली चाकणकर, तृप्ती देसाई, गायिका कार्तिकी गायकवाड याही सहभागी झाल्या.
मार्गदर्शन ठरले मोलाचे मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते पहाटे पासूनच दाखल झाले होते. त्यांना पार्किंग, रस्त्यांची माहिती देण्यात आली. सर्व प्रमुख रस्त्यांवर कार्यकर्ते तैनात करण्यात आले होते. हे कार्यकर्ते आलेल्या वाहनधारकांना पार्किंगकडे जाण्याचा मार्ग सांगत होते. तर मोर्चाच्या ठिकाणी कसे याचे याची माहिती देण्यास कार्यकर्तेही तैनात होते.वाशिम : रविवारी वाशिम येथे भरपावसात सकल मराठा समाजाचा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चात महिला व विद्यार्थिनींची संख्या लक्ष वेधून घेणारी होती. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोर्चाला बाजार समितीपासून प्रारंभ झाला. त्याचवेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु पावसाची कुठलीही तमा न बाळगता मोर्चेकऱ्यांनी मोर्चाची शिस्त बिघडू दिली नाही. भरपावसात मोर्चा शिवाजी चौकात पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला मोर्चातील युवतींनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मोर्चा पाटणी चौक, डॉ. आंबेडकर चौक, बसस्थानक चौक, असे मार्गक्रमण करीत, जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पोहोचला. मोर्चामधील सहा युवतींनी मागण्यांचे बारा पानी निवेदन उपस्थित विशाल जनसमुदायासमोर वाचून दाखविले. त्यानंतर तेच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या मोर्चाला जवळपास दोन लाखांवर महिलांची उपस्थिती होती. ‘टोकाची परिस्थिती असल्याने निर्णय घ्या’सांगली : संपूर्ण राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मागणीची टोकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारला याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले. कदम म्हणाले की, मराठा समाज फार सोशीक आहे. त्यांनी आजवर सर्व गोष्टी सहन केल्या. केवळ शेती हाच त्यांचा उद्योग असल्यामुळे कुटुंबांची संख्या वाढत गेल्यानंतर शेतीचे विभाजन झाले. कोणताही नेता नसताना शिस्तबद्ध मोर्चे गांधीजींच्या अहिंसक क्रांतीचे पुढचे पाऊल आहे. आठवलेंनी निर्णय घ्यावामराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठरविले असेल, तर त्यांनी तातडीने तो घ्यावा. त्यांना त्यासाठीच केंद्रात संबंधित खाते दिलेले आहे, असे कदम म्हणाले. आघाडी सरकारच्या कालावधीत याविषयी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यांनी अहवाल दिल्यानंतर आरक्षणाचा निर्णयसुद्धा झाला, मात्र न्यायालयाने त्यामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा या त्रुटी दूर करून आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.यवतमाळमध्ये मूक आक्रोशयवतमाळ : कोपर्डीपासून शेकडो मैल दूर असलेल्या यवतमाळातही रविवारी निघालेला मराठा-कुणबी मूक क्रांती मोर्चा ‘लक्ष’वेधी ठरला. जिल्ह्यातील लक्षावधी पावलांनी पाऊस झेलत यवतमाळातील रस्ते भगवे करून टाकले. १६ तालुक्यांच्या विस्तारित आणि शेतकरीबहुल लोकसंख्येच्या यवतमाळ जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांचे जत्थे शहरात दाखल होऊ लागले. पांढरकवडा, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंबमधून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी शांतपणे शहरात प्रवेश केला. आर्णी, नेर, पुसद, दिग्रस, महागाव, बाभूळगाव आदी तालुक्यांतील मोर्चेकऱ्यांनी समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) गाठले. कुठेही नारे नव्हते. घोषणा नव्हत्या. केवळ गाडीवर एक भगवा झेंडा फडकत होता. सकाळी १० वाजता समता मैदान ‘फुल्ल’ झाले. त्याचवेळी आलेल्या पावसानेही मोर्चेकऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकले नाही. प्रमुख मार्गांनी फिरून हा मोर्चा दुपारी एलआयसी चौकात पोहोचला तेव्हा जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर तरुणींच्या शिष्टमंडळानेच जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर दुपारी ३ वाजता मोर्चाचा समारोप करण्यात आला.