आचरा : मालवण तालुक्यातील संस्थानी थाटाच्या इनामदार श्री देव रामेश्वराला इनाम मिळालेल्या आचरा गावामध्ये आजही विविध प्रथा, परंपरा, रूढी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजऱ्या केल्या जातात. गावपळण हीदेखील तीन वर्षांनी पाळली जाणारी अशीच एक आगळीवेगळी गूढरम्य प्रथा. सन २०१२ मध्ये झालेल्या गावपळणीनंतर यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने इनामदार श्री देव रामेश्वराचा यावर्षी कौल (हुकूम) झाल्यास ही गावपळण होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांनी देवदिवाळीच्या दिवशी गावपळण होणार की नाही, असा कौल रामेश्वर संस्थानच्या गावकऱ्यांकडून घेतला जाणार असल्याने त्या दिवसाकडे आचरावासीयांची नजर लागून राहिली आहे.गावपळण का साजरी केली जाते याविषयी अनेक तर्कवितर्क किंवा कथाकल्पना असल्या तरी आधुनिक काळातदेखील आचरावासीय इनामदार श्री देव रामेश्वराचा झालेला हा आदेश शिरसावद्य मानून तितक्याच श्रद्धेने आपल्याला दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून मिळणाऱ्या हक्काच्या सुट्टीचा आनंद अत्यंत मनमुरादपणे लुटतात. गावपळण म्हणजे तीन दिवस तीन रात्र गावामध्ये कोणीही वास्तव्य करून राहू नये. चूल आणि मूल असा संसाराचा रामरगाडा हाकणारी घरातील स्त्रीदेखील आपल्याला यानिमित्ताने मिळणारा चेंज अनुभवायला उत्सुक झालेली असते. गावाच्या वेशीबाहेर आपला राहता राजमहाल सोडून तंबू, झोपड्यांमधून मोकळ््या आसमंताखाली सहजीवनाचा मिळणारा आनंद आचरावासीय अत्यंत हौसेने लुटतात. गावाचा एकोपा वाढायला गावपळणीसारखी प्रथा निश्चितच लाखमोलाची ठरते. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात थोड्या कालावधीकरिता मिळणारे तणावरहित जीवन आचरेवासीयांच्या मनाला निश्चितच उभारी देणारे ठरते. वैज्ञानिक बाजूने विचार करता आचरा गावचे वातावरण या तीन दिवसांच्या कालावधीत पूर्णत: शुद्ध होऊन जाते. अनादीकाळामध्ये दूरदर्शी ठेवून आखलेली गावपळणसारखी प्रथा निश्चितच अनुकरणीय असून आचरावासीयांच्या कौतुकाचा विषय आहे. (वार्ताहर)
आच-याच्या ऐतिहासिक गावपळणीकडे लक्ष
By admin | Published: November 20, 2014 2:27 AM