मुंबई : राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत जाणीव-जागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर बांधकाम मजुरांची मुले लसीकरण मोहिमेपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार आहे.गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी विभागाने केलेल्या तयारीबाबत आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील डॉक्टर्स, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, एएनएम यांच्याशी मंगळवारी संवाद साधला. या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुप कुमार यादव, संचालक डॉ. संजीव कांबळे उपस्थित होते. या वेळी लसीकरण मोहिमेदरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.आरोग्यमंत्री म्हणाले, देशातून गोवर आजाराचे समूळ उच्चाटन आणि रुबेलावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही लसीकरण मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका, आवश्यक त्या औषधांची तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असेल याची खातरजमा करावी, स्थानिक पातळीवर बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या सदस्यांचे सहकार्य घ्यावे; त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचा देखील यात सहभाग करून घ्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.‘दोन दिवसांत अहवाल द्या’प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेत एका आठवड्यात सुमारे १० लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत. प्रत्येक बालकाच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक असून दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
रुबेला लसीकरणासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर लक्ष; २७ नोव्हेंबरपासून मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 2:54 AM