मुंबई : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली, या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.मंगळवारी दुपारी सेना भवनात ही बैठक होईल. सरकारमध्ये राहण्याबाबत ठाकरे काय बोलतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महापलिका निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना-भजपाचे संबंध ताणले गेले आहेत. कल्याणमध्ये झालेल्या शेवटच्या प्रचारसभेत उद्धव यांनी सरकारला हद्दपार करण्याची भाषा केली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यातील दात मोजण्याची भाषा करून शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले होते. शिवाय, प्रचारादरम्यान सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा ठाकरे यांच्याकडे दिला होता. तो स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे या बैठकीत पक्षाचे मंत्री, आमदार काय भूमिका मांडतात हेही महत्त्वाचे असेल. कल्याण-डोंबविलीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला काही जागा कमी पडत आहेत. त्यासाठी भाजपाबोरबर जायचे की मनसेला सोबत घ्यायचे, याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
सेनेच्या बैठकीकडे लक्ष
By admin | Published: November 03, 2015 2:44 AM