पुणे : ’ती’ च्या ज्वलंत प्रश्नांकडे स्थिर देखाव्यांच्या माध्यमातून केवळ लक्ष वेधून घेण्याने ’ती’ चे प्रश्न सुटणार नाहीत. या प्रश्नांचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी, याच जाणीवेतून गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सवात प्रबोधनात्मक देखावे सादर करणा-या वृंदा साठे यांनी यंदा सहा मंडळांमध्ये ‘महिलांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, ‘लैंगिक शोषण’, ‘स्त्रीभ्रूण हत्या’ अशा महिलांच्या विविध प्रश्नांवर आधारित जिवंत देखावे सादर करून समाजप्रबोधनाच्या या कृतीशील उपक्रमाद्वारे स्त्रीशक्तीचा जागर केला. गणेशोत्सवात वर्षानुवर्षे हलत्या देखाव्यांची परंपरा चालत आली आहे, हे देखावे भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्यामुळे मंडळांकडून याच देखाव्यांना पसंती दिली जात असे. मात्र आता या देखाव्यांची क्रेझ कमी झाली असून, सामाजिक संदेश देणा-या जिवंत देखाव्यांना मंडळांकडून प्राधान्य दिले जात आहे. विशेषत: स्त्री च्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंडळाकडून देखील पुढाकार घेतला जात आहे, ही त्यातील उल्लेखनीय बाब! आजही समाजात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या देखाव्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून समाजात गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक देखावे सादर करून वेगळा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे वृंदा साठे यांनी ’लोकमत’ शी बोलताना सांगितले. १ स्त्रीभ्रूणहत्या चिंतेची बाब ठरत आहे, या प्रश्नांवर फक्त चर्चा करून उपयोग नाही तर पुरूषांची मानसिकता बदलणे हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे, ही जाणीव जनमानसात निर्माण करण्यासाठी यंदा महिलांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणा-या सहा देखाव्यांची मालिका आम्ही गणेशोत्सवात सादर केली. २ कँम्प भागातील श्रीकृष्ण मंडळात स्वराज्यासाठी असलेले महिलांचे योगदान व बेटी बचाओ बेटी पढाओ, सोमवार पेठ येथील गोसावी पुरा मंडळात लैंगिक शोषण, गवळी वाडा येथे जागर स्त्री शक्तीचा, धनकवडी येथील आलिशान मंडळ व येरवड्यातील कंजार भाट मंडळात अभिमान भारतीय संस्कृतीचा देखावा सादर करण्यात आला.
वेधले ‘ती’च्या विषयांकडे लक्ष
By admin | Published: September 15, 2016 1:49 AM