"मोदी आणि फडणवीस म्हणजे 'बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी'; रोजगार मेळावा केवळ एक इव्हेंट"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 05:25 PM2022-10-22T17:25:27+5:302022-10-22T17:37:37+5:30
Atul Londhe Slams Narendra Modi And Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते ७२ लोकांनाही नोकऱ्या देऊ शकले नाहीत."
मुंबई - केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने नरेंद्र मोदी व भाजपाने रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, मेगा इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्ट यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून ही भरती थांबवली. आता हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच होत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आता नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहेत. श्रम पोर्टलवर २२ कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त ७ लाख लोकांना नोकरी मिळाली आहे. CMIE च्या मते ४५ कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे. तर केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या २५ लाख जागा रिक्त आहेत. उपलब्ध नोकऱ्या, नोकरी मागणाऱ्यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘उंट के मुंह में जिरा’ असेच म्हणावे लागले.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते ७२ लोकांनाही नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फडणवीसांनी नोकर भरती केली नाही तर वेगळीच भरती केली. दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदारांची भाजपामध्ये भरती केली. मोदी आणि फडणवीस म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ असे लोंढे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"