ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या मानलेल्या दोन भावांना न्यायालयाने 30 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी हा आदेश दिला. अतुल यांच्या पत्नी प्रियांका यांनाही या प्रकरणात डेक्कन पोलिसांनी अटक केली असून त्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
कल्याण रामदास गव्हाणे (वय 45) प्रसाद ऊर्फ बाळू रामदास गव्हाणे (वय 48, दोघेही, रा. कोंढवा खुर्द) अशी जामिन मिळालेल्या दोघांची नावे आहेत. तापकीर यांनी प्रभात रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट येथे 14 मे रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी पत्नीच्या जाचामुळे आणि ढोल ताशा चित्रपटामुळे आर्थिक तोटा झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट फेसबुकवर अपडेट केली होती. या प्रकरणात अतुल यांचे वडील बाजीराव नामदेव तापकीर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कल्याण आणि प्रसाद दोघे न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना जामीन मिळावा, यासाठी बचाव पक्षाने अर्ज केला होता. दोघेही प्रियांका यांचे मानलेले भाऊ आहेत. अतुल प्रियांका यांना व्यवस्थित नांदवत नव्हते. मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले पैसे देत नव्हते. या कारणामुळे प्रियांका यांच्या विनंतीवरून दोघांनी अतुल यांना समजावले होते. हे समजावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला.या प्रकरणात बचाव पक्षातर्फे विजयसिंह ठोंबरे, रुपाली पाटील-ठोंबरे आणि जयपाल पाटील यांनी काम पाहिले.
"मी आता कायम स्वरुपी माझ्या आईसोबत राहणार याचा मला खूप आनंद आहे", असं सुसाइड नोटमध्ये लिहित निर्माते अतुल तापकीर यांनी 14 मे रोजी आत्महत्या केली. जागतिक मातृदिनाच्या दिवशी आणि अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने मराठी चित्रपट उद्योगाला हादरा बसला. अतुल तापकीर यांनी पुण्यातल्या हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तापकीर यांनी फेसबुकवर सुसाइड नोट लिहिली . पत्नी प्रियंकाशी सतत होत असलेल्या वादाला आणि तिच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं.