मुंबई : जोगेश्वरीतील न्यू म्हाडा पोलीस वसाहती धोकादायक स्थितीत असल्याने त्याचे तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिट करून या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर या इमारतींच्या दुरुस्तीसाठी आपल्या आमदार निधीतून १० लाखांचा निधीही दिला. अलीकडेच जोगेश्वरी म्हाडा पोलीस वसाहतींमधील ६ क्रमांकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. या घटनेची दखल घेत राज्यमंत्री वायकर यांनी पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत बुधवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक बोलावली. गृह, बांधकाम, वित्त आणि अन्य संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. येथील सर्व १३ पोलीस वसाहती या अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने महिन्याभरात या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे. तसेच या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात यावा, असे आदेश वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर या इमारतींच्या महत्त्वाच्या कामांच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून रुपये १० लाखही दिले. जोगेश्वरी पोलिसांची ७४७ कुटुंबे आहेत. म्हाडाने १९९२ साली या इमारतींचे बांधकाम केले होते. १९९४ पासून या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. येथील १३ निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ७ सप्टेंबर २०१५ रोजी ८.२९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु अद्याप हा निधी वितरित न झाल्याने इमारतींची दुरुस्तीच सुरू झाली नसल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. पोलीस वसाहतीतील बहुतांशी इमारती कमकुवत झाल्या असून इमारतींच्या अनेक भागांना तडे गेले आहेत. तसेच इमारतींच्या गॅलरीचा तसेच घरातील खोलीचा स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीतील लिफ्ट बंद आहे. इमारतींमधील इलेक्ट्रीकची यंत्रणा नादुरुस्त झाल्याने आगी लागण्याच्या घटनाही घडल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांनी केली. (प्रतिनिधी)
पोलीस वसाहतींचे आॅडिट करा
By admin | Published: May 19, 2016 2:51 AM