नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही लोकहिताची अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. शनिवारी प्रत्येक नगरसेवकाशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. राज ठाकरेंनी महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत नागरिकांचे समाधान होऊ शकेल अशा पद्धतीने काम होऊ न शकल्याने लोकसभा निवडणुकीत मनसेला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शनिवारी येथील राजगड कार्यालयात त्यांनी पालिकेतील कामगिरीची माहिती घेऊन एकप्रकारे पंचनामाच केला. पालिकेतील ३९ पैकी ३७ नगरसेवकांशी एकावेळी एकच अशी चर्चा त्यांनी केली. पालिकेत कामे होतात काय, तुमच्य प्रभागात किती कामे झाली? किती कामे मंजूर आहेत, कामे झाली असतील तर त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचली काय, असे प्रश्न करताना दहा कोटी, वीस कोटी रुपयांची कामे झाली असे सांगणार्या नगरसेवकांकडून सायंकाळपर्यंत कामांच्या याद्याही त्यांनी मागविल्या. गोपनीय भेटीत अनेकांनी उघडपणे महापौर आणि अन्य पदाधिकार्यांच्या कामगिरीवर टीका केली. या सर्व मुद्यांची नोंद राज ठाकरे यांनी स्वत: लेखी नोंद करून घेतली. (प्रतिनिधी)
लोकसभेच्या निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट
By admin | Published: May 10, 2014 10:08 PM