मुंबई, दि. 11 - राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशनने (पाला) 15 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहिहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील लाउडस्पीकर बंदीमुळे ध्वनी व प्रकाश उद्योगाच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या ७५ डेसिबलचे बंधन लाउडस्पीकरवर लादण्यात येत आहे. परवाना दिला जात नाही, तसेच परवानगी देतानाही पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप पालाचे अध्यक्ष रॉजर ड्रेगो यांनी यांनी सांगितले.
पोलीस कोणत्याही कार्यक्रमाआधी घरी येऊन लाउडस्पीकर जप्त करून नेत असल्याचा गंभीर आरोप पालाने केला आहे. मुळात असा कोणताही कायदा किंवा न्यायालयाचे आदेश नाहीत. तरीही पोलिसांकडून मनमानी कारवाई सुरू असल्याचे पालाचे म्हणणे आहे.
नाशिकमध्ये 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा 75 डेसीबलपेक्षा अधिक ठेवण्यास बंदीच्या निषेधार्थ मुंबईतील पाला संघटनेच्या आदेशानुसार नाशिकमधील साऊंड व लाईट व्यावसायिकांनीही स्वातंत्र्यदिनादिवशी 'नो साऊंड डे' (म्युट डे) म्हणून पाळणार असल्याचे सांगितले आहे. अमर वझरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. शिवाय, 18 ऑगस्टच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावरही डीजे व्यावसायिक मूक मोर्चा काढणार आहेत.
पुण्यात यंदाची दहीहंडी लाउडस्पीकरविना
दहीहंडीच्या ऐन तोंडावर राज्यभरातील लाउडस्पीकर व्यावसायिकांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीच्या आणि कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात येत असल्याने सणासुदीच्या काळात राज्यभरात लाउडस्पीकर बंद राहणार आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीत साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने बंदची हाक दिली. पोलिसांकडून डी.जे.चालकांना होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टम जप्त करण्याची होणारी कारवाई आणि होणारा छळ या विरोधात हा बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. सामान्य वातावरणाचा आवाजही ५५ डेसिबल असतो. मग स्पीकर वाजवायचे तरी कसे? असा सवाल करतानाच पोलिसांकडे डेसिबल मोजण्याची यंत्रणाही नाही, असेही असोसिएशनने स्पष्ट केले. हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. दहीहंडीसह कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात लाउडस्पीकर वाजविण्यात येणार नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केल्याने उत्सव मंडळांचे धाबे दणाणले आहेत.