मुंबई : तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, तसेच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.राज्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आल्याने बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून होणार आहे.मुंबईसह राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात दिले होते; परंतु अद्याप पूल आणि रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. रस्त्यांवर खड्डे पडल्याने सरकार विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
२०० किलोमीटरची पाहणी; अहवाल सादर करामुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात दोन दिवस, तर कार्यकारी अभियंता यांनी आठवड्याच्या तीन दिवस रस्ते आणि पुलांची किमान दोनशे किलोमीटरपर्यंत पाहणी करावी. खड्डेमुक्त रस्ते आणि पूल कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंत्यावर असणार आहे. राज्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते व राष्ट्रीय महामार्गांना या सूचना लागू राहतील, असेही या अध्यादेशात नमूद केले आहे.
आदेशात काय?३१ ऑगस्टपर्यंत खड्डे पूर्णत: बुजवले गेले पाहिजेत. खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. गणेशोत्सवापूर्वी राज्यभरातील सर्व क्षेत्रीय अभियंता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची अद्ययावत माहिती संकलित स्वरूपात जमा करावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या पुलांचा आढावा घेऊन खड्डे व दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावे.सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सव काळात रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील, याची काळजी घेऊन त्याचे नियोजन करावे.