ऑनलाइन लोकमतलातूर/औराद शहाजानी, दि. 22 - सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बुधवारी औराद शहाजानी परिसरावर मान्सून प्रसन्न झाला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जवळपास ९० मिनिटांत तब्बल ९४ मि.मी. पाऊस कोसळला. या ढगफुटीने शहरासह परिसरातील गावातही पाणी पाणी करून टाकले. या पावसाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला. बसस्थानकाचा दोन एकर आणि आजूबाजूचा दोन एकर अशा चार एकरांत जवळपास ५ फूट पाणी साचले. बाजारपेठेत पाणी घुसले. शेकडो घरांमध्ये पाणी-पाणी झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरल्याने रूग्णांचे हाल झाले. मुख्य रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी वाहू लागल्याने सर्वच वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. परिसरातील शेतातही पाणी साचले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. या ढगफुटीनंतर तगरखेडा येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची तीन दारे अर्ध्या मीटरने उघडून हे पाणी कर्नाटकात सोडण्यात आले आहे. औरादसह तगरखेडा, वांजरखेडा, शेळगी, सावरी, मानेजवळगा, बोटमाळ, ताडमुगळी या परिसरातही या पावसाने पाणी-पाणी करून टाकले. विजांच्या कडकडाटात ही जोरदार बरसात झाली. शेकडो एकराचे बांध फुटले पावसाच्या या थैमानात औराद शहाजानीच्या पंधरा किलोमीटर परिसरातील शेकडो एकर शेताचे बांध वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, बांध वाहून गेल्याने दोन शेतकऱ्यांची शेती एका वावरात परावर्तीत झाली. पंधरा किलोमीटरच्या परिसरातील सर्वच शेतांनी बघावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.
औराद शहाजानीत ढगफुटी, ९० मिनिटांत ९४ मिमी एवढा पाऊस
By admin | Published: June 22, 2016 9:57 PM