Aurangabad and Osmanabad district Name change : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला, त्यानंतर केंद्रानेही या नामांत्तराला मंजुरी दिली. पण, नामांतर फक्त शहरांचे झाले की जिल्ह्याचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार आहे.
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरणाला मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा करण्यात आले आहे. राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तालयाने नामांतर हरकती 27 मार्च पर्यंत मागवल्या आहेत आणि उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी देखील २७ मार्च रोजी आहे.
राज्य सरकारच्या नोटिफिकेशननुसार, आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावेही बदलण्यात आली आहेत. महसूल आणि वन विभागाकडून आज अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 4 च्या पोट कलम (1) चे खंड सहा या अधिकाऱ्यांचा वापर करत जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे.
नामांतराविरोधात याचिका
शहरांच्या नामांतराला विरोध असलेल्या याचिकांवर सोमवारी मुंबई खंडपीठात सुनावणी घेण्यात आली; मात्र तत्पूर्वीच केंद्र व राज्य शासनाने नामांतरांचे सूचनाप्रसिद्ध केलेले असल्याने आता याचिकाकर्त्यांना या सूचनापत्रांच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर २७ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती धाराशिवचे याचिकाकर्ते खलील सय्यद यांनी दिली. धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत.