मुंबई - राज्यात निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची प्रत्येकवेळी गाजतात ते औरंगाबादमधील मुलभूत प्रश्नच. लोकसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबादधील कचरा प्रश्न चांगलाच गाजला होता. किंबहुना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना याच समस्येमुळे धक्का बसला आहे. त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांमध्ये पाणी, कचरा, रस्ते हेच प्रश्न गाजले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हेच प्रश्न शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेत चंद्रकांत खैरे सतत 15 वर्षे खासदार होते. तर महानगर पालिकेत देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी येथील कचरा प्रश्नाने भीषण रूप धारण केले होते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता.
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची समस्या देखील भीषण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जिल्ह्यात असूनही जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. त्यामुळे मोठी नाराजी आहे. तर रस्त्यांच्या बाबतीतही लोकांना त्रास सहन करावा लागला होता. या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादकरांनी जिल्ह्यात लोकसभेला परिवर्तन केले. आता देखील तेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहेत.
विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. त्यात शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विधानसभेला देखील पुन्हा एकदा मुलभूत प्रश्न गाजण्याची शक्यता असून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपसाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.