अमिताभ श्रीवास्तव ल्ल औरंगाबादअत्याधुनिक मिराज-२००० ही दोन लढाऊ विमाने फ्रान्सहून भारतात आणताना त्यांच्या उड्डाणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेले औरंगाबादचे भूमीपुत्र असलेले मनीष मिनोचा यांच्या रुपाने भारतीय हवाई दलात औरंगाबादनेही मानाचा तुरा रोवला आहे. मिनोच्या यांच्या नेतृत्वाखाली गेल्या शुक्रवारी ग्वाल्हेर येथील लष्करी धावपट्टीवर ही दोन विमाने हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली.ग्वाल्हेर येथील हवाई दलाच्या विमानतळावर फ्रान्सहून आलेली मिराज-२००० ही लढाऊ विमाने २४ एप्रिल रोजी उतरली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशु कार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. मिनोचा यांचा जन्म औरंगाबादेतील. ते येथेच लहानाचे मोठे झाले. विमान उड्डाणांच्या मोहिमेच्या तुकडीचे ते प्रमुख होते.संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात फ्रान्सकडून घेतलेल्या मिराज-२००० या ५१ लढाऊ विमानांना अत्याधुनिक करण्यासाठी जुलै २०११ मध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०११ मध्ये भारताने फ्रान्सला दोन विमाने पाठविली होती. विमाने अत्याधुनिक केल्यानंतर ती ताब्यात घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची एक तुकडी फेब्रुवारीमध्ये मनीष मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सला गेली होती. सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली वैमानिकांसह ५० सदस्यांची तुकडी २४ एप्रिल रोजी भारतात परतली. या दोन आसनी लढाऊ विमानांनी ग्रीस, इजिप्त, दोहा, गुजरातमधील जामनगरमार्गे ग्वाल्हेर असा प्रवास केला.भारतीय हवाई दलाकडे सध्या मिराज-२००० ही ४८ लढाऊ विमाने आहेत. ही विमाने पाकिस्तानच्या के एफ -१६ विमानांचा सामना करण्यासाठी खरेदी करण्यात आली होती. आता ही दोन अत्याधुनिक विमाने भारताने ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित सर्व विमानांचे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) भारतीय तंत्रज्ञ अत्याधुनिकीकरण करतील. हवाई दलाचे कॅप्टन मनीष मिनोचा यांनी औरंगाबादमधील होलीक्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. गुणवंत विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. १९८९ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लष्करी सेवा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला व तेथूनच १९९१ मध्ये बारावी व त्यानंतर १९९४ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे हवाई दलाचे एक वर्ष प्रशिक्षण घेतले. १९९५ मध्ये ते हवाई दलात दाखल झाले. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारे मनीष मिनोचा ते औरंगाबादकर असल्याचे अभिमानाने सांगतात. मिनोचा यांचे बालमित्र व उद्योजक सतीश लोढा हे चिंतामणी कॉलनीत राहतात. मित्राच्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटतो. ते म्हणाले की, ‘मनीष बालपणापासूनच शिस्तप्रिय, निगर्वी आणि ध्येयाप्रती जागरूक होता. लष्करात जाण्याचे त्याचे बालपणीचे स्वप्न होते व ते त्याने पूर्ण केले. मनीष आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. संदीप मालू हे मनीष मिनोचा यांच्या सर्वांत जुन्या मित्रांपैकी एक. तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांची मैत्री आहे. संदीप यांनाही आपल्या मित्राचा अभिमान वाटतो. मनीष यांनी ग्वाल्हेरमध्ये कमांडिंग आॅफिसरपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते म्हणाले की, ‘मिराज-२०००’ सारख्या विमानाला फ्रान्सहून मायदेशी आणणे अत्यंत आव्हानात्मक होते; मात्र धाडसी स्वभाव असलेल्या मनीष यांनी ही मोठी जबाबदारी लीलया पेलली.