ऑनलाइन लोकमत/बापू सोळुंके औरंगाबाद, दि. 10 - राज्यातील संवेदनशील शहरांपैकी एक असलेल्या औरंगाबादच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी ८०० चौकांत तब्बल १ हजार ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत,अशी माहिती पोलीस आयुुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.पोलीस आयुक्त म्हणाले की, शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात सेफ सिटी प्रकल्प सादर केला होता. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यांतर्गत शहराचा कानाकोपरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्यात येत आहे. औरंगाबादेतील तब्बल ८०० चौकांत १ हजार ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या सेफ सिटी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जून-जुलैअखेरपर्यंत पूर्ण होईल आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कामेही पूर्ण होईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. स्वयंचलित चेहरा ओळखणारे कॅमेरेहा प्रकल्प अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने राबविला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चेहरा ओळख स्वयंचलित यंत्रणा असेल. एखाद्या गुन्हेगाराचे छायाचित्र एकदा स्कॅन करून संगणकाला कमांड दिल्यानंतर एखाद्या गर्दीत संबंधित छायाचित्रातील व्यक्तीचा चेहरा जुळल्यानंतर हजारो, लाखो लोकांच्या गर्दीत हा माणूस कोठे बसला आहे, हे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सहज समजणार आहे. चेहरा ओळखणारे स्वयंचलित सॉफ्टवेअर या कॅमेऱ्यांना जुळले जाणार आहे.सिग्नल तोडणाऱ्यांना मिळेल चलनया कॅमेऱ्यांमध्ये आॅटोमेटिक नंबर प्लेट स्कॅनर असेल. लाल सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटच्या आधारे त्या वाहन मालकाच्या नावे आॅटोमेटिक दंडाचे चलन तयार होईल. तसेच पोलिसांमार्फत त्या वाहनचालकाला चलन पाठविले जाऊन दंड वसूल केला.६ ड्रोन कॅमेरेही मिळतीलशहर पोलिसांना व्हीआयपींचा बंदोबस्त, मोठमोठ्या सभा, मंत्रिमंडळ बैठकीप्रसंगी आयोजित मोर्चासाठी बंदोबस्त ठेवावा लागतो, अशा गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ६ ड्रोन कॅमेरे सेफ सिटी प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालयास प्राप्त होणार आहे. हे कॅमेरे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून हॅण्डल करणे पोलिसांना शक्य होईल.
औरंगाबाद शहराला लवकरच १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच
By admin | Published: April 10, 2017 8:15 PM